सोमवार, २० मे, २०१९

मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करा - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या सूचना


     सोलापूर,दि.20 :- सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या.
सोलापूर आणि माढा मतदारसंघातील मतमोजणी येत्या 23 मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मतमोजणी प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे श्री शिवछत्रपती रंगभवन येथे प्रशिक्षण झाले  त्यावेळी डॉ. भेासले बोलत होते.  यावेळी निवडणूक  निरीक्षक श्रीमती उषा कुमारी, कवींद्र कियावत, आदि उपस्थित होते.
            मतमोजणी केंद्रावर सर्व मतमोजणी कर्मचारी अधिकारी यांनी ठिक 6 वा उपस्थित राहावे. आपले ओळखपत्र सोबत आणावे त्याशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी सकाळी 8.00 वाजता सुरु होईल. सर्वानी साडेसात वाजता आपल्या टेबलावर उपस्थित रहायचे आहे.नियंत्रण संच शिपाई टेबलावर आणून देतील. मतमोजणीसाठी आपल्या टेबलावर आणण्यात आलेले कंट्रोल युनिट फेरीनूसार वाटप केलेल्या तक्त्यानुसार असल्याची खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्री.रामचंद्र शिंदे म्हणाले, ‘मतमोजणीसाठी विशिष्ठ बैठक व्यवस्था केली आहे जेणेकरुन मतमोजणी प्रक्रियेत सुसूत्रता येईल, अडचण निर्माण होणार नाही. प्रत्येक टेबलला एक मतमोजणी  पर्यवेक्षक, सहाय्यक  व एक शिपाई अशी  व्यवस्था केली आहे. तसेच केंद्र शासनाचा प्रत्येक टेबलला एक सूक्ष्म निरीक्षक म्‌हणून प्रत्येक टेबलला एक, संगणक टेबलाला एक व निरीक्षकाच्या टेबलाला एक, असे 16 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येतील’.
प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहल भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी, राहुल कदम, यांच्यासह निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000000

रविवार, १२ मे, २०१९

हिरवा चारा, पेंड यामुळे जनावरांत सुधारणा - मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीतील पशुपालकांची माहिती


                    सोलापूर, दि.  12 :- माझी पाच जनावरे मी छावणीत दाखल केली आहेत. छावणीत वेळेवर मिळत असलेला हिरवा चारा आणि पेंड यामुळे जनावरे सुदृढ पण होऊ लागली आहेत आणि दूधातही वाढ झाली आहे... मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील चारा छावणीत जनावरे घेऊन आलेले बापू माने आज सांगत होते.
            श्री. माने मूळचे सांगोला तालुक्यातील आहेत. पण मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील चारा छावणीबाबत त्यांना समजले आणि त्यांनी आपली जनावरे या छावणीत दाखल केली. मेथवडे येथील संत ज्ञानेश्वर ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने लेंडवे चिंचाळे येथे ही छावणी चालवली जाते. छावणीत आज मोठी 674 आणि लहान 104 जनावरे आहेत.
            छावणीतील मोठ्या जनावरांना दररोज 18 किलो हिरवा चारा आणि लहान जनावरांना 9 किलो हिरवा चारा दररोज दिला जातो. प्रत्येक जनावरांस दररोज अर्धा किलो पेंड दिली जाते, असे श्री. माने यांनी सांगितले. छावणीत सीसीटीव्ही, पशुपालकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लेंडवे चिंचाळे गावातील गोविंद लेंडवे यांनीही आपली पाच जनावरे छावणीत दाखल केली आहेत. वेळच्यावेळी मिळत असलेला चारा, पाणी, पेंड यामुळे जनावरांत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
            मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे जय हनुमान ग्रामीण विकास संस्थेमार्फत चारा छावणी सुरु आहे. या छावणीत 542 जनावरे आहेत. संस्थेचे शिवाजी गावकरी छावणीचे व्यवस्थापन बघतात. छावणीच्या शेजारीच छोटे तळे तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये टँकरव्दारे पाणी सोडले जाते. त्यातून पुढे सायफन पध्दतीने पाणी प्रत्येक पशुपालकांपर्यंत पोचवले जाते, असे श्री. गावकरी यांनी सांगितले.
            अण्णा निवृत्ती चव्हाण यांनी या छावणीत पाण्याची उत्तम व्यवस्था असल्याचे सांगितले. मंजुळा गोणे आणि तनुजा गोणे आपली जनावरे घेऊन छावणीत आहेत. हिरवा चारा, पेंड, पाणी मिळत असल्यामुळे जनावरांची चांगली व्यवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.
            गोणेवाडीत महालिंगराजा दूध उत्पादक संस्थेमार्फत छावणी सुरु आहे. छावणीत चारा, पेंड त्याचबरोबर पाणी मिळत असल्याचे श्री. संजय मासाळ यांनी सांगितले.
*****

मंगळवेढ्यात 48 छावण्यात 26 हजारांवर जनावरे


        


    सोलापूर, दि.  12 :- मंगळवेढा तालुक्यातील 27 गावांत 48 ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या सर्व छावण्यांत लहान 3508 आणि मोठी 22641 अशी एकूण 26149 जनावरे आहेत.  चारा छावण्यांचे अजून प्रस्ताव आले तरी त्यांना मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठवले जातील, असे मंगळवेढ्याचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी आज सांगितले.
            श्री. रावडे यांनी आज तालुक्यातील लेंडवे चिंचाळे, गोणेवाडी येथील चारा छावण्यांना भेटी दिल्या, पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुष्काळावर प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत.
            श्री. रावडे यांनी सांगितले की, तालुक्यातील 54 संस्थांनी 71 छावण्यांसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी 65 छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पैकी 48 संस्थांना चारा छावणी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चारा छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांच्या कानाला टॅगिंग करण्यात आले आहे. चारा छावणीत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या रेकाँडिंगची तपासणी केली जाते.
            छावणीत दाखल झालेल्या जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लहान जनावरांचे निर्जंतुकीकरण केले गेले आहे. आजारी जनावरांची स्वतंत्र निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांची मोबाईल ॲप्लिकेशनव्दारे नोंद  केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही छावण्यांत पशुपालकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक छावणीत पशुपालक समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या बैठका घेण्याच्या सूचना सर्व संस्थांना देण्यात आल्या आहेत.
******

शुक्रवार, १० मे, २०१९

चारा छावण्या चालकांनी पशुधनाची जपणूक करावी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरसोलापूर दि.  10 :  चारा छावण्या चालकांनी छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांना चारा आणि पशु वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन  देण्यास प्राधान्य  देवून पशुधनाची जपणूक करावी,,  अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
            डॉ. म्हैसेकर यांनी काल गुरुवारी सांयकाळी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, खुपशिंगी, गोनेवाडी आणि शिरशी येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपायुक्त प्रताप जाधव,  पुरवठा उपायुक्त्‍ निलीमा धायगुडे, उप विभगीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.
             डॉ. म्हैसेकर यांनी म्हणाले,   शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगला सकस चारा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. छावणीत दाखल होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या जनावरांची छावणी चालकांनी नोंद ठेवावी.  जनावरांना शासन निकषानुसार चारा,  खुराक द्यावा.   पिण्यास लागणारे पाणी उपलब्ध करावे. छावणीतील पशुपालकांची समिती स्थापन करावी. तसेच  छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे टँगिंग करण्याबरोबरच छावणी चालकांनी पशुपालकांना कार्ड वितरीत करावे. छावणीत आग प्रतिबंधक व्यवस्था करावी. ’
000000000